“आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व”
“आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन
पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व”
लातूर मधील प्रसिद्ध उद्योजक तथा समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे
व्यक्तिमत्त्व, माझे स्नेही, आदरणीय श्री. श्रीकांतजी चंद्रशेखर हिरेमठ यांच्या सहवासात निखळ
मैत्री, आदर, जिव्हाळा, काळजी व ऋणानुबंध या सर्व समाज जीवनातील असाधारण पण अत्यंत
गरजेच्या असणाऱ्या या सर्व घटकांचा आनंद व अनुभव घेत असतानाच या निमित्ताने
त्यांच्या कुटुंबियां सोबत सुद्धा तसाच ऋणानुबंध घट्ट होत गेला. हा ऋणानुबंध कमी
कालावधीत इतका घट्ट होण्यामागचा मुख्य प्रवाह म्हणजे त्यांच्या मातोश्री, आमच्या पूज्य आजी,
अर्थात, कै. चंद्रकलाबाई हिरेमठ यांना ईश्वरी
सान्निध्यात जाऊन पहाता पहाता एक वर्षाचा काळ लोटला. पूज्य आजीच्या या प्रथम पुण्य
स्मरणाचे औचित्य साधत त्यांच्या आठवणींना किंबहुना त्यांच्या सहवासात घालविलेल्या
अमुल्य क्षणांना व मी अनुभवलेली आजी या अनुभवरुपी भावनां शब्दरुपी अस्तित्वात
उतरविण्याची विनंती हिरेमठ परिवाराकडुन करण्यात आली आणि खरच माझ्या मनाची एक
वेगळीच अवस्था झाली. एका अर्थाने प्रचंड आनंद झाला की पूज्य आजीच्या आठवणीं व
व्यक्तिमत्त्वाला उजाळा देतादेता मला पुनश्च एकदा ते सोनेरी क्षणांची अनुभुती घेता
येईल पण थोडीशी भीती पण वाटत होती की अत्यंत जड झालेल्या अंतःकरणातुन पुज्य
आजींप्रती उचंबळून येऊ पहाणार्या भावना मला हा शब्दरुपी लेखनाचा प्रपंच खरच
पूर्णत्वास घेऊन जाऊ देतील का?
मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकेन
का? पण परत मला पूज्य आजीचे एक वाक्य
आठवले जेव्हा सहज चर्चा करत असताना त्या बोलून गेल्या
होत्या की, "सुधीर भावना प्रत्येकांसाठी
महत्त्वाच्या असतात पण प्रत्येकाने भावनेच्या आहारी जाऊन वास्तवापासून दुर जाऊ
नये. प्रत्येकांनी वास्तव कसे का असेना ते स्विकारलेच पाहिजे" आणि मी माझी
लेखणी हातात घेऊन माझा हा अभिवादन रूपी शब्दप्रवास सुरु केला.
खरच, अगदी थोड्या कालावधीच्या सहवासात अशा
अनेक मौलीक विचारांची शिदोरी पुज्य आजीने त्यांच्या सहवासात असणार्या माझ्या
सारख्या अनेकांना दिली आणि निश्चितच या भौतिकवादी, स्वकेंद्रित व विज्ञान व
तंत्रज्ञानाच्या विकसनशील युगात अध्यात्म, वात्सल्य, जिव्हाळा, आत्मविश्वास, शिस्त, संयम व आस्था हे सर्व गुण आपल्या
व्यक्तिमत्त्वात जोपासुन निखळ आयुष्य जगण्यासाठी मदत होईल. म्हणुनच पुज्य आजी च्या
प्रथम पुण्यस्मरण निमित्त केलेला स्मरणीकेचा अट्टहास हा खरच खूपच कौतूकास्पद कार्य
आहे आणि याबद्दल मी आमचे स्नेही श्री. श्रीकांतजी हिरेमठ, परिवार व प्रा. इ. आर मठवाले सर (मामा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन
करतो व यानिमित्ताने आम्हाला दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी
आभार व्यक्त करतो.
मित्रांनो, ज्याप्रमाणे आई हा शब्द उच्चारताच
क्षणातच ह्रदयाचा ठोका चुकतो व आपण प्रचंड भावनिक होतो. आई म्हणजे काळजाची हाक
असते, आई म्हणजे निशब्द अशी जाग असते, आई म्हणजे अंतरीचे गुढ असते, खरच आई म्हणजे ईश्वराचे रूप असते.
मुळात आई या शब्दामध्येच प्रचंड ऊर्जा आहे आणि आई म्हणजे त्यागाचे प्रतिक आहे व आई
म्हणजे सर्वस्व. मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात
प्रचंड प्रतिभा असणारी अशी एखादीतरी प्रतिभासंपन्न व्यक्ती असतोच. अशा
प्रतिभासंपन्न व्यक्तींचा कळत नकळत इतरांवर प्रभाव पडत असतो. किंवा इतरांना अशा
व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटत असतो. हिरेमठ परिवार सुद्धा यास अपवाद नाही. या
परिवारातील पुज्य आजी म्हणजे अशीच एक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व होती. खर म्हणजे, श्री. श्रीकांतजी हिरेमठ यांच्या संघर्षमय जीवन प्रवासात
त्यांच्यासाठी खरी प्रेरणा व मार्गदर्शक म्हणजे त्यांची आईच होती तर या खडतर
प्रवासाची खरी सारथी त्यांची अर्धांगिनी म्हणजेच सौ. शैलजा ताई या होत्या. या
परिवाराबद्दल बोलायचे म्हणजे,
पुज्य आजींना दोन अपत्य, एक मुलगा व एक मुलगी. मोठा मुलगा श्री. श्रीकांतजी हिरेमठ जे लातूर
मध्ये एक उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध
आहेत व त्यांना डॉ. नेहा व इंजि. श्रेया या मुली आहेत तर मुलगी, सौ. शांता संजय स्वामी या लातूर मध्येच वास्तव्यास आहेत व त्यांना
एक मुलगी व एक मुलगा आहे.
पुज्य आजी च्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण हा निश्चितच
आमच्यासाठी अगदी मंतरलेला व मंत्रमुग्ध करणारा आहे. पुज्य आजी म्हणजे एक
शिस्तप्रिय, वाचन प्रिय व मायाळू व्यक्तीमत्व.
वाढत्या वयोमानानुसार त्यांनी स्वतःवर अनेक बंधने लादुन घेतली होती. त्या
तब्बेतीच्या बाबतीत कसलीच तडजोड करत नसत. त्यांना स्वत ची कामे स्वतः करण्यातच
आनंद मिळत असे. मी, अजित भाऊ व नागेश भाऊ कधी मिळुन
त्यांच्या घरी गेलो की त्या आवर्जून आम्हा तिंघाना एकत्रित पाहुन
"त्रिमूर्ती" म्हणुन संबोधायच्या. मला व अजित भाऊंना "राम -
लक्ष्मण" म्हणुन संबोधायच्या. आम्हाला त्या नेहमी वेगवेगळ्या पुस्तकांची, धार्मिक ग्रंथाचा संदर्भ देत विविध अध्यात्मिक व आयुष्याचे
तत्वज्ञान रेखाटणारी पुस्तके वाचण्याचा मानस बोलुन दाखवायच्या. आम्हाला
त्याच्यासाठी काही वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा आग्रह करायच्या. खरच आम्ही
हे अनेकवेळा अनुभवलय की त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायची म्हणजे तुम्हाला
अध्यात्म, तत्वज्ञान, संस्कार, मुल्य, आचरण, यांचे वाचन व ज्ञानच असले पाहिजे अन्यथा
कोणीही त्यांच्याशी चर्चा करु शकत नव्हते. पुज्य आजी या वयाच्या पंच्याहत्तरीत
सुद्धा नियमित दैनिक वृत्तपत्र वाचायच्या. त्यांनी जन्म हा अखेरचा, शिवलिला अमृत,
स्वामी विवेकानंदांचे चरित्र, आर्य चाणक्य,
रामदास स्वामींचे ग्रंथ, पोथी असे अनेक धार्मिक ग्रंथ वाचुन काढले होते. फक्त वाचुन समाधान
न मानता त्यातिल आचार, विचार, संस्कार, शिकवण हे स्वतः कसे आत्मसात करता येतील यावर पुज्य आजी सतत चिंतन
करत असायच्या आणि जेव्हा आज आपण त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आलेख पाहतो किंबहुना त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वरील उल्लेख
केलेल्या सर्व बाबींची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.
पुज्य आजींच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाबद्दल बोलायचे झाल्यास असे
म्हणता येईल की अनेक नात्यांना एकत्रित बांधुन ठेवणारा, प्रेम व आपुलकीच्या खळखळत वाहणाऱ्या पाण्यासारखे निखळ, स्वच्छ व पारदर्शक व्यक्तीमत्व म्हणजे पुज्य आजी होय. एक आदर्श
मुलगी, बहिन, पत्नी, सुन, माता, मावशी, आत्या सासु व आजी अशी अनेक नाती
त्यांनी अगदी जिव्हाळ्यानी व निस्वार्थीपणे पार पडली. सौ. शैलेजाताई व त्यांच्या
मध्ये सासु - सुन नाही तर माय - लेक असे नाते होते. दोघांनाही एकमेकांशिवाय
अस्तित्वच नसल्यासारखे होते. त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी असणारा प्रचंड आदर, प्रेम, वैचारिक समन्वय व निस्वार्थ भाव हा
खरच वाखाणण्याजोगा आणि आदर्शवत होता. खरे तर, हा त्यांचा भाव, समन्वय व माय लेकीच्या ऋणानुबंधास लाजवेल असा आदर, प्रेम व काळजी यातुन निर्माण झालेल्या त्रिवेणी संगम म्हणजे पुज्य
आजी व सौ. शैलेजा ताई यांचे अप्रतिम नाते होय.
मित्रांनो, काही व्यक्तिंचे व्यक्तीमत्व खरच खुपच
वेगळे व असाधारण असते. ते ज्याच्या संपर्कात येतात किंवा त्यांच्या सहवास ज्यांना
लाभतो ते खरच भाग्यवान असतात. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा निरंतर शिकत
असतो. कुटुंब, नातेवाईक, स्नेही मित्र किंबहुना थोडक्यात समाज हा प्रत्येकासाठी अनौपचारिक
शिक्षणाचे प्रमुख माध्यम असते व याची प्रभावी अंमलबजावणी सुरु होते ते आपल्या
कुटुंबापासून. मित्रांनो, ज्या पूज्य आजींच्या अगदी थोड्या
कालावधीच्या सहवासाने आमच्या सारख्या अनेक व्यक्तिंना अध्यात्मिक, आयुष्याचे तत्वज्ञान, सुखी व समाधानी आयुष्याचे धडे मिळाले
तर त्याच पुज्य आजींच्या अंगा खांद्यावर खेळत खेळत लहानाचे मोठे झालेल्या
नातवंडाचे व्यक्तीमत्व कशा प्रकारे फुलत गेले असेल याची आपण कल्पना करु शकतो.
मित्रांनो, म्हणतात की "आनंदाचे चांदणे
म्हणजे आजी.” आज खरे म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती
किंवा नातवांसाठी आजी आजोबांचा सहवास हि एक कल्पनाच बनुन राहिली आहे पण पुज्य
आजींच्या नाती, अर्थात डॉ. नेहा व इंजि. श्रेया, या खरच खुप भाग्यवान आहेत कि त्यांना पुज्य आजीचा अमुल्य असा
सोनेरी सहवास लाभला. खर म्हणजे फक्त नातीच नाही तर अंश, पूज्य आजीचा गोड पणतू, याला सुद्धा पुज्य आजीचा सहवास व
शुभाशीर्वाद मिळाले जे आयुष्यात त्याला एक सक्षम व जबाबदार व्यक्ति बनण्यासाठी
सदैव सोबत असतील. पूज्य आजी व त्यांचा नात जावाई, अभिषेक यांच्यामधील अगदी कमी कालावधीत
निर्माण झालेला जिव्हाळा व प्रेम हे सुद्धा खुप काही सांगुन जाते आणि या प्रेमाची,
जिव्हाळ्याची कृतज्ञता अभिषेक नी
पूज्य आजींची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करुन व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
केला.
व्यक्तींच्या व्यक्तीमत्वातील विविध गुणांची किंबहुना
वैशिष्ट्यांची प्रचिती वेगवेगळ्या प्रसंगी येत असते. आपण समाजजीवनात वावरत असताना
अनेक चांगल्या वाईट गोष्टींना किंबहुना घटनांना सामोरे जावे तो. अशा परिस्थितीत
आपल्या सोबत सदैव आपले आई वडील व परिवार उभा असतो आणि त्या परिस्थितीतून यशस्वीपणे
बाहेर पडण्यासाठी आपल्याला आतंरिक ऊर्जा देणारा हा खरा आपला परिवार व चार जिवाचे मित्र
असतात. अगदी याच पद्धतीने हिरेमठ परिवारावर ओढवलेल्या काही अनपेक्षित संकटांमधे
सुद्धा हि माय माऊली अगदी स्थिर,
संयमी, प्रचंड आशावादी व इतरांना धीर देणारी
होती. यांच्यामधे येवढे असाधारण सामर्थ असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची
समाधानी वृत्ती व त्यांच्यावर असणारा अध्यात्माचा प्रचंड प्रभाव. त्या सतत
म्हणायच्या की "तुम्ही आयुष्य किती वर्षे जगलात याला महत्व नाही. तर तुम्ही
तुमचे आयुष्य कसे जगलात याची ईश्वर दप्तरी नोंद असते."
मित्रांनो, हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल की
पूज्य आजीच्या आयुष्यभराच्या निषठेंचे व त्यांचा मुलगा श्री. श्रीकांतजी हिरेमठ
यांच्या संघर्षमय यशस्वी आयुष्याचे व आपल्या आईवर असलेल्या प्रचंड भक्ती व
प्रेमाचे फलीत म्हणुन दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी श्री. श्री. श्री. १००८ काशी
जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री. श्री. श्री. १००८ नुतन काशी
जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य
सान्निध्यात व ष. ब्र. १०८ डॉ. शांतविरलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासह इतर आकरा
ष. ब्र. १०८ शिवाचार्य महाराजांच्या उपस्थित पुज्य आजीचा अमृत महोत्सव साजरा
करण्यात आला. खरे म्हणजे असा योगायोग जुळून येणे व जगद्गुरू महास्वामीजी यांच्या
सान्निध्यात अमृत महोत्सव साजरा होणे हे म्हणजे खरोखरच पूज्य आजीचे व संपूर्ण
हिरेमठ परिवाराचे भाग्यच.
मला आज सुद्धा पुज्य आजीचे ते वाक्य आठवते जे बोलताना त्यांचे डोळे
पुर्ण पाणावले होते. या भव्य दिव्य सोहळ्यामुळे त्या प्रचंड भारावून गेल्या होत्या
आणि खुपच भावनिक झाल्या होत्या. मला त्या म्हणाल्या होत्या कि "सुधीर माझ्या
मुलाने माझी सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण केल्या. माझी पंच्याहत्तरवी अशा पद्धतीने
होईल हे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. मला माझ्या श्रीकांत व शैलेजानी या अमृत
महोत्सवाच्या रुपाने मला खुप मोठी भेट दिली आहे. दोन्ही जगद्गुरू महास्वामीजींचा व
अकरा शिवाचार्य महाराजांचा एकाच वेळी शुभाशीर्वाद मिळणे हे माझे भाग्यच आणि आता
मला देवाने त्यांच्याजवळ बोलावले तरी चालेल. माझी एक सुद्धा इच्छा राहिली
नाही." पुज्य आजीची हि भावना खरच स्तब्ध करणारी होती. खरच मला आदरणीय श्री.
श्रीकांत सरांचा अभिमान वाटला कि मुलगा असावा तर श्री. श्रीकांतजी सरांसारखा. पण
कदाचित ईश्वराला सुद्धा पूज्य आजींचा सहवास हवाहवासा वाटत होता की काय, लगेचच पुढच्या महिन्यात, म्हणजे दिनांक ४ ऑक्टोबर 2022 रोजी पूज्य आजी आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेल्याची बातमी
समजली आणि काही क्षणांसाठी काळ थांबल्याची प्रचिती आली. जवळपास आठ दशके आपल्या
प्रचंड बुद्धिमत्ता, अध्यात्म, वात्सल्य, जिव्हाळा, आत्मविश्वास,
संयम, शिस्त व प्रचंड आस्था अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी
अनेक आप्तेष्ट व आमच्या सारख्या असंख्य व्यक्तींच्या ह्रदयात अत्यंत आदराचे स्थांन
निर्माण करुन जगाचा निरोप घेणार्या या असाधारण व्यक्तीमत्वाने आपल्या जगण्यातुन
शेवटी एकच संदेश दिला आणि तो म्हणजे "नाती हे रक्तातुन नाही तर ह्रदयातुन
निर्माण होतात आणि ति ह्रदयातच जपायची असतात."
पुज्य आजींच्या
प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या पावण स्मृतीस विनम्र अभिवादन करतो व थांबतो.
धन्यवाद!
आपले स्नेही
डॉ. सुधीर पं.
मठपती
सौ. साक्षी सुधीर
मठपती
लातूर
Comments
Post a Comment