कोविड_19_अर्थात_कोरोना_आणि_मी: एक_यशस्वी_लढा!
कोविड_19_अर्थात_कोरोना_आणि_मी: एक_यशस्वी_लढा!
प्रणाम!
मी प्रा. डॉ. सुधीर मठपती.....मी कोविड -19/ कोरोना या आजारातून ठिक होऊन घरी परतलो आहे. माझ्या काही जवळच्या मित्रांनी आग्रह अर्थात हट्ट केला की मी माझे अनुभव व एकंदरीत हा प्रवास शब्दामध्ये मांडावा आणि सर्वांशी शेअर करावा. मित्रांचा हट्ट तर पूर्ण करावाच लागणार कारण त्यांच्या मैत्रीच्या अस्तित्वाशिवाय आपल्या अस्तित्वाला अर्थ नाही.
दुपारचे साधारण 3 वाजले असतील. एका अनोळखी नंबरवरुन फोन आला आणि मी रिसिव करताच मला समोरच्या व्यक्तीने विचारले की आपले नाव xxx च का? आपला पत्ता xxx आहे का? मी त्यांना होकार देताच त्यांनी मला सांगितले की आपली Rt. PCR टेस्ट पाॅजिटिव आली आहे आणि आपणास तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले. मी अगदी शांत चितांने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच बोलन एकत होतो आणि डोळ्यासमोर दिसत होती ती फक्त आणि फक्त माझ्या रुममध्ये माझ्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवलेली माझ्यासाठी एक दिशादर्शक, प्रेरणास्थान व आशिर्वादरुपी समुद्र असणाऱ्या माझ्या आजीचा (मायचा) फोटो आणि अंतर्मनाच्या पटलावर एका नंतर एक येणाऱ्या आदरणीय वडील, आई, अर्धांगिनी व माझे दोन गोंडस लेकरांच्या प्रतिमा. तो क्षण मला फक्त आणि फक्त या नात्यांच्या गुरफटलेल्या अविरत ऋणानुबंधांचा धागा आणि त्यांचे माझ्या आयुष्यातील असाधारण अस्तित्व याचीच जाणीव करुन देत होता. माझा रिपोर्ट पाॅजिटिव आला खरा पण खरी चिंता लावुन गेला ती या नात्यांची ज्यांच्या अस्तित्वामुळेच माझे अस्तित्व होते आणि ज्याच्या प्रेरणेमुळे व अस्तित्वामुळेच माझा आयुष्याचा अट्टहास चालु होता.
मी सदरील फोन शांतपणे बोलुन मला अर्ध्या तासाचा वेळ द्या म्हणुन ठेवुन टाकला आणि पाच मिनिटे डोळे बंद करून शांत बसुन राहिलो. असंख्य विचाराचा काहुर काही क्षणात वादळ बणुन शुन्य झालेल्या मनाचा प्रतेक कोपरा पिंजुन काढत होता पण मी मात्र शांतच होतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटापैकीच एक हे छोटेस पण विदारक संकट ज्याचे अस्तित्व हे माझ्या मनाच्या धारनेवर व माझा याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरच अवलंबून होते आणि हे मात्र मि मागच्या पाच - सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे संपूर्ण जगात (भारत, महाराष्ट्रा, मराठवाडासह) निर्माण झालेल्या संकटामुळे जाणुन होतो. मनाची धारना जवळपास करूनच ठेवली होती पण अस अचानक हे घडेल असे कदापि कधी वाटले नव्हते. कदाचित हाच अनुभव अनेक करोनाची लागन होऊन त्यावर यशस्वीपणे मात केलेल्यांचा असेल. असो..
पाच मिनिटांनी जागेवरून उठत माझ्या अर्धांगिनीस आवाज दिला आणि लांबुनच सांगितले की माझा रिपोर्ट पाॅजिटिव आला आहे पण घाबरण्याचे काहीही कारण नाही मला कसलेही लक्षणे नाहीत फक्त थोडी सर्दी आहे त्यामुळे मला आता काही दिवस शासकीय वैद्यकीय उपचार घेण्यासाठी एकांतात रहावे लागेल. तोच निरोप आदरणीय आई - वडीलांनी पण ऐकला आणि त्यांनीच मला धिर दिला की सगळे व्यवस्थित होईल यात कोणीही घाबरण्याचे कारण नाही.
मी लागलीच माझ्या अगोदर पासुन क्वारंनटाइन असलेल्या रूम मध्ये गेलो आणि काही मित्र व शुभचिंतकांच्या मदतीने (आदरणीय डॉ. शिवाजी काळगे मामा, श्रीकांत हिरेमठ सर, नागेश भाऊ मानखेडकर, दीपकजी मठपती, डॉ. गजानन हलकंचे, डॉ. संजय शिवपूजे सर, जगदीशजी स्वामी, अजित भाऊ) चर्चा केली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सतत फोन येत होता कि आम्ही आपणास घेण्यासाठी रूग्णवाहिका पाठवत आहोत आणि आपण तैय्यार रहा. वाटत होते, इथे काही अडचण आली तर बाहेरगावी जाऊन खासगी रुग्णालयात अॅडमिट व्हावे पण मनात प्रश्न एकच कुटुंब व त्यांचे उद्याचे येणारे रिपोर्ट्स. म्हणुन मनातच ठरवल त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत तरी आपण शासकीय रुग्णालयातच अॅडमिट व्हायचे आणि त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतर काय करायचे ते परिस्थितीनुसार ठरवु किंवा शक्य होत असेल तर इथेच शासकीय रुग्णालयातच उपचार घेऊ. याच दरम्यान माझे श्रद्धास्थान माझ्यासाठी सर्वकाही आदरणीय राजुकाकांचा (उपविभागीय अभियंता, रत्नागिरी) फोन आला आणि म्हणाले झाले ते झाले. काहीही घाबरण्याचे कारण नाही. सर्व व्यवस्थित होईल फक्त तु स्टेबल रहा. खरे तर त्यांना बोलताना मला शब्दच सुचत नव्हते. मी खुप भावनिक झालो होतो पण समोर माझी अर्धांगिनी लाबुन माझ्याकडे पहात होती. ती खचुन जाईल म्हणून मी काकांशी हसत हसतच बोललो आणि तुम्ही पण काळजी घ्या (ते अगोदरच आजारी आहेत) म्हणुन फोन बंद केला. माझे वडील बंधू अजित भाऊ जे नेहमी माझ्या सोबत असतात, या परिस्थितित त्यांनी स्वतःला होम क्वारंनटाइन करून घेतल होत आणि तेच योग्य होत. खर तर या दिवसात ते माझ्या सहवासात नव्हतेच पण तरी एक सावधगिरी व एक जबाबदारी म्हणून त्यांनी स्वतःला होम क्वारंनटाइन करून घेतल.
मी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला होकार दिला आणि माझी बॅग भरण्यास लागलो. तेवढ्यात जेवणाचे ताठ समोर आले पण भुक असुनही इच्छा नसल्याने जेवन गेल नाही. अर्धांगिनी (सौ. साक्षी सूधीर मठपती ) ओलावल्या डोळयांनी सतत विचारत होती की आता पुढे काय? पण तिला मी काहीही बोलु शकत नव्हतो. माझ्या पण डोक्यात पडलेला प्रश्न पुढे काय हाच होता पण तो या सर्वाची होणारी चाचणी आणि येणारा रिपोर्ट याचा होता. पण मी कोणालाही काहीही जाणवु दिले नाही. दरम्यानच्या अर्ध्या पाऊन तासाच्या काळात आशा वर्कर्स भगिनी (कोविड फ्रंट लाइन फाईटर) आल्या माहिती संकलित करून निघून गेल्या पण हि वार्ता सबंध परिसरात पसरली आणि फोन वाजायला चालु झाले. शक्यतो मी कोणाचाही फोन घेतला नाही आणि सगळ्यांना टेक्स्ट करून नंतर बोलतो असे म्हणालो.
एवढय़ात एका मित्राचा फोन आला आणि त्यानी सांगितले की रुग्णवाहिका आली आहे तुम्ही बाहेर या. आपल्या घरासमोरील रस्ता हा अतिशय लहान असल्या कारणाने त्या ड्रायव्हरला विनाकारण त्रास नको म्हणून मी अगोदरच मित्राला एम्बुलेंस मुख्य रस्त्यावरच थांबवायला सांगितली होती. मी माझी बॅग उचलली माझ्या आजीच्या फोटोंचे दर्शन घेतले आणि पायऱ्या उतरायला लागलो. आई वडीलांचे आशिर्वाद घ्यावे वाटले पण परत पदस्पर्श नको म्हणुन टाळल आणि मनातुन चरणस्पर्श केल. माझ्या दोन्ही गोंडस लेकरांनी (#प्रतिक्षा व #श्रेयनकुमार) पप्पा बाय & टेक केअर म्हणून मला लांबुनच बाय केल. अर्धांगिनी माझ्या माग माग पायर्या उतरत खाली घराच्या मुख्य गेटला येत होती. खाली आलो तर तिथे दोन मित्र अगोदरच येऊन थांबली होती (ब्रम्हानंद व राहुल) आणि मला धिर देण्याचा प्रयत्न करत होती. मुळात मला माझ काहीच वाटत नव्हते कारण अगोदरच Mind Set करुन ठेवल्याने या धक्क्याचा प्रहार मुळात जाणवलाच नाही पण कुटुंबातील इतर सदस्यांच्या चिंतेमुळे मी थोडासा अस्वस्थ होतो आणि ती अस्वस्थता स्वाभाविकच होती. मयुर, ओम व इतर शुभचिंतक मित्रांनी अॅम्ब्युलन्स मुख्य रस्त्यावरच थांबवली होती. अॅम्ब्युलन्चा चालक PPE Kit मध्ये एम्बुलेंस च्या बाजुला थांबला होता आणि मी त्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. माझे सर्व शेजारी शुन्य भावनेने माझ्याकडे पहात होते. काही मित्र जसे डॉ. शैलेश, अॅड मंठाळेजी, घाडगे सर, सिदधु, वरद, रवी, राजु, मनोज, बालाजी, समीर व अन्य काही... मला धीर देत आपण लवकरच घरी परताल अशा शुभेच्छा देत होते तर काही Get Well Soon म्हणत हसत हसत आपला अंगठा दाखवत होते. आणि हेच Spirit आणि वर्तन खरे अपेक्षित आहे.
खरच Covid-19 पॉझिटिव्ह आहे समजल्यानंतर लांब पळून जाणारे, निगेटिव्ह झाल्यावर फुलं घेऊन स्वागताला येतात आणि हीच खरी आपल्या समाजाची शोकांतिका आहे म्हणायला हरकत नाही. पण मी मात्र या बाबतीत खूपच सुदैवी. सर्व शेजारी बांधवांनी (काही अपवाद असतीलच) मला अतिशय प्रसन्न भावनेने धीर देत See Off केल आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरी फोन करून काही अडचण असेल तर सांगा, पाहिजे असेल तर सांगा म्हणून विचरना केली. काही मित्रांनी हव्या असलेल्या सर्व गोष्टी माझ्या अनुपस्थितीत घरी पुरविल्या. खर तर हाच धर्म आहे आणि हेच संस्कार आपल्या मातीचे आहेत जे आपणास या करोना महामारी च्या संकटात व पुढे सुद्धा मनापासून जपायचे व टिकवायचे आहेत. या कोविड 19 मुळे अगोदरच माणसे एकमेकापासून दूर गेली आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत आपली मने दूर जाता कामा नये. हे संकट काही ठराविक लोकांसाठी तर निश्चितच नाही.. आज मला आहे आणि उद्या आणखी कोणास आहे. करोना बाधीत हा कोणी ही असु शकतो. तुमचा कुटुंबातील व्यक्ती , नातेवाईक, जिवलग मित्र, शेजारी किंवा अन्य कोणी. पण त्याला फक्त आपलेपणाची भावना द्या आणि सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी आणि ती योग्य प्रकारे टिकवण्यासाठी त्यांना धीर द्या. वाईट काळातच खरे व्यक्तीमत्वातील आपल्या असणार्याण विविध नात्यातील गुणधर्म/गुणविशेष समोर येतात म्हणतात आणि ते अगदी योग्यच आहे. असो...
मी काही क्षणात अॅम्ब्युलन्स जवळ येऊन पोहोचलो. मधे बसण्या अगोदर सन्मानिय चालकांनी मला काही सुचना केल्या आणि मी होकार देऊन आत बसलो. एम्बुलेंस पुर्णपणे बंधिस्त होती. मला शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात आले. अॅम्ब्युलन्स च्या मागे मागे नरहाता माझे दोन मित्र रूग्णालयातील कागदपत्राची औपचारिकता पुर्ण करण्यासाठी आली होती.
कोविड-19 अर्थात करोना समोर हात टेकवुन, घाबरून काहीही होणार नाही. या प्रसंगात खरी गरज आहे ती सुरुवातीच्या टप्प्यात निदान, योग्य उपचार, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारसरणी, योग्य आहार, व्यायाम व स्वतःचा स्वतःवर अविरत असणारा (आत्म) विश्वास. यात आपणास जरा जरी शंका येत असेल, लक्षणे वाटत असतिल तर आजिबात लपवु नका व घाबरु नका. निसंकोचपणे योग्य ठिकाणी लागलीच टेस्ट करुन घ्या. मला काही होत नाही, मी असा, मी तसा, मी जिमला जातो, वाॅकिंगला जातो, रनिंग करतो, सगळे प्रिकाॅशनस घेतो, रोज एक सॅनिटाइजरची बाॅटल वापरतो, मास्क वापरतो वगैरे वगैरे बरच काही आपण ऐकत असतो. हे सगळं खर जरी असल तरी कोठेतरी, कसेतरी आणि कोणत्या तरी क्षणी नकळत, अजाणतेपणी आपल्यावर त्याचा (कोविड-19 चा) हल्ला होऊ शकतो. आणि असाच प्रसंग सर्व काही करुन, काळजी घेऊन, सर्व प्रोटोकॉल, नियम पाळुन सुद्धा माझ्या बाबतीत घडला. हे सर्व आपणाशी शेअर करण्यामागचा हेतु म्हणजे पुढच्याची ठेच मागच्यासाठी शहानपणाची ठराव एवढच. कारण आपण फक्त आणि फक्त एक नाहीत. आपण म्हणजे संपूर्ण कुटुंब होय... कारण आपण जेव्हा संक्रमित होतो तेव्हा शक्यतो आपला विचार नकरता आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करत असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील विक पॉइंट व स्ट्रॉग पाॅइंट म्हणजे आपले कुटुंबच दुसर काय? असो...
शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर माझी प्राथमिक तपासनी करण्यात आली आणि मला ज्या कोविड-19 केअर सेंटर ला ठेवायचे तिथे घेऊन जाण्याच्या सुचना सन्मानिय ड्रायव्हर महोदयांना देण्यात आल्या. मी परत एम्बुलेंस मध्ये बसलो व मधे बसण्या अगोदर सोबत आलेल्या मित्रांचे लांबुनच आभार मानले आणि त्यांना घरी जायला सांगितले आणि एम्बुलेंस कोविड-19 केअर सेंटर च्या दिशेने निघाली. काही मिनिटांत एम्बुलेंस कोविड-19 केअर सेंटर ला पोहचली. पण हा काही मिनिटाचा प्रवास मन सुन्न करणारा होता. सतत फोन व्हायब्रेट होत होता पण कोणाचाही फोन घेतला नाही आणि फक्त माझे स्नेही मित्र डॉ. गजानन हालकंचे (फिजिशियन) सरांशी चर्चा केली. मनात फक्त एकच भिती होती कि कुटुंबातील कोणीही संक्रमित व्हायला नको आणि तसे झालेच तर पुढे काय करायचे? कुठे जायचे? वगैरे वगैरे.
कोविड-19 केअर सेंटर ला पोहचताच मी एम्बुलेंस च्या बाहेर आलो. सन्माननीय ड्रायवर महोदयांचे आभार मानले आणि मुख्य प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाच्या काही महिला भगिनी (Covid-19 Frontline Fighters) त्यांचे रूटिन काम करत होत्या. त्यानी मला GMC मधून दिलेला कागद पाहिला आणि लागलीच औपचारिकता पुर्ण करून माझे टेंपरेचर व Spo2 चेक केल व मला काही दिवसांचे मेडिसिन दिले आणि मला एक नंबर सांगुन त्या रुम मध्ये जाण्यास सांगितले. मी त्यांच्या आदेशानुसार सबंधित रूममध्ये गेलो. तिथे अगोदरच तिन व्यक्ति होत्या एक साधारण 70 च्या आसपास, 45 तर तिसरा 30 च्या आसपास असेल. तिंघानिही माझ हसुन स्वागत केल आणि मला माझा परिचय विचारुन आराम करा म्हणुन सांगितले. मी त्यांच्याकडून येथील रूटिन जाणुन घेतल व इतर काही गप्पा मारल्या पण मनात मात्र ऊद्या टेस्ट मध्ये काय होइल, किती पाॅजिटिव येतील याचीच भिती होती. रात्री 8 वा जेवनाचा डबा आला. जेवन गेल नाही. फक्त आरदी पोळी आणि थोडासा भात खाल्ला आणि गोळ्या घेऊन पडुन राहिलो. आदरणीय श्री. नागेश भाऊ, श्रीकांतजी हिरेमठ सर, दिपकजी मठपती व संजयजी स्वामी (समुपदेशक, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर) यांच्याशी संपर्क करून उद्याच्या रॅपिड अॅण्टीजन टेस्टची माहिती घेतली. माझ्या रूम मध्ये कसलीच रेंज नव्हती त्यामुळे संपर्कात त्रास होत होता. बराच वेळ अनेक शुभचिंतकांचे फोन आले (उल्लेख करने शक्य नाही) शक्यतो मी कोणाचाही फोन घेतला नाही. घरातील सर्व डॉक्टर मंडळी सतत संपर्कात होती आणि तो फार मोठा आधार होता. फक्त आदरणीय प्राचार्य साहेबांना टेक्स्ट करुन कल्पना दिली आणि शांत पडुन राहिलो. साधारण रात्री 11.30 वा एका जिवलग मित्राचा फोन आला आणि त्यानी सांगितले की त्याने सगळे नियोजन केले आहे. उद्या दुर्दैवाने कुटुंबातील काही सदस्य पाॅजिटिव आले तर तुम्ही एका खासगी रुग्णालयात एकत्र राहुन उपचार घेऊ शकता. मी सगळे नियोजन केले आहे. तु निंवात. कसलीच काळजी करू नको आम्ही आहोत सोबत. पण त्याला मी पाहु उद्या परिस्थितीनुसार म्हणुन सांगितले व त्याचे आभार मानले. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले तरी मला झोप येत नव्हती. सारखा एकच विचार डोक्यात होता कि उद्या काय होईल? साधारण 3.30 वा. मला झोप लागली आणि 5:30 वा. माझ्या रुममेटनी मला उठवल. म्हणाले उठा थोडा व्यायाम करा आणि स्नान करुन रेडी रहा. मानसिकता नव्हती तरीपण उठलो आणि फ्रेश होऊन परत फोन चालु झाले. समजल की मी जिथे आहे तिथेच माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांची टेस्ट होणार आहे. पण मधेच एका मित्राचा फोन आला आणि समजल की नियम बदलले आहेत आणि आता सर्वाची टेस्ट शहरातीलच एका ठिकाणी (घरापासून अगदी जवळ) करण्याचे ठरले आहे. तरी मला भेटण्यासाठी व काही गरजेच्या वस्तु देण्यासाठी आई, वडील, अर्धांगिनी, बच्चे कंपनी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदरणीय नागेश भाऊ व श्रीकांत हिरेमठ सर हे माझ्या परिवारासोबत सकाळी साधारण 9 वा माझ्या कोविड-19 केअर सेंटर ला आले. नागेश भाऊनी माझे सर्व सामान घेऊन मुख्य प्रवेशद्वारातुन माझ्याकडे येताना दिसले सोबत श्रीकांत सर होते आणि नकळत डोळ्यात पाणी आलं. खरच काही माणसं अफलातूनच असतात. जरी या आपल्या आयुष्याच्या उण, सावली व पाऊसा चा खेळ निसर्गाने बदलता ठेवला आसला तरी काही मानस कधीही बदलत नसतात. सदैव तुमच्या सोबत राहून संकटसमयी #Man_is_not_made_for_defeat.... या हेमिंगवे च्या करारी आणि अंगात वादळ निर्माण करणार्या वाक्याची आठवण तरी करून देण्यासाठी सोबत असतात.
मुळातच हे मैत्रीच नातच अफलातून. याला कसल्याच सिमा कधिच थांबवु शकल्या नाहीत आणि पुढ ही थांबवु शकणार नाहीत. खरच... मैत्री कधीच मोठी नसते पण त्या मैत्री च्या नात्याला न्याय देणारे मित्र मात्र सदैव मोठेच असतात. "मोहब्बत, प्यार या और उलझते रिश्तो का तो कुछ पता नहीं यारो लेकिन बेशक जिंदगी में कुछ ऐसे फरीश्तो जैसे दोस्त होने चाहिए जो हर मुश्किल मे आपकी परछाई बनके आपका साथ दे...." आणि या बाबतीत मात्र मी पूर्वीपासूनच खुपच भाग्यवान आहे.
नागेश भाऊनी माझ्या घरून आणलेले सर्व सामान व काही गरजेच्या मेडिसिनस माझ्या काही अंतरावर टेकवल (प्रोटोकॉल नुसार). श्रीकांत हिरेमठ सर पण मला लागणार्या. सर्व महत्त्वाच्या वस्तु, फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, पाणी बॉटल, कपडे, वगैरे घेऊन आले होते. ते दोघे मला भेटले आमच्यात काही या सर्वाच्या टेस्ट करुन घेण्याच्या अनुशंगाने काही डायलॉग्ज झाले आणि ते परत मुख्य प्रवेशद्वाराकडे गेले आणि आई वडीलं व अर्धांगिनीस आत मला फक्त पहाण्यासाठी पाठवले. मी काही क्षणच प्रोटोकॉल नुसार योग्य अंतरावरून अर्धांगिनीस बोललो कारण मला माहित होत तिला जास्त बोलन म्हणजे तिला रडण्यास भाग पाढण म्हणुन तिला फक्त एकच बोललो आई वडीलांना धीर दे आणि कसलाही प्रसंग आला तरी डगमगायचे नाही. काहीही होणार नाही. फक्त हा काही दिवसांचा त्रास आहे तो धैर्याने नखचता सहन करायचा आणि पुर्णपणे स्टेबल रहायच, शांत राहायच. कसलाच निगेटिव्ह विचार डोक्यात येऊ द्यायचा नाही आणि मी तिला परत जाण्यास सांगितले. नंतर आई वडील समोरून माझ्याकडे येताना दिसले. ते ही काही बोलु शकत नव्हते आणि मला हि काही सुचत नव्हत. मला लक्षात आलं की हे दोघेही आता भावनिक होत आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी साचतय. मी त्यांना काहीच बोललो नाही मी त्यांना फक्त धीर दिला आणि सांगितल तुमची आता टेस्ट होणार आहे व मला खात्री आहे ती निगेटिव्हच येणार पण आपण ती करुन घेणे गरजेच आहे. तुम्ही काहीच काळजी करु नका आणि निश्चित रहा. सर्व काही ठिक होइल. मी त्यांच्याशी एवढेच बोललो आणि त्यांना जाण्यास सांगितले. ते जसे मागे वळले मी माझ्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करून दिली आणि आई वडिलांचे हात सुद्धा अश्रु पुसण्यासाठी त्यांच्या डोळ्याकडे वळलेले मला स्पष्ट जाणवले. कदाचित त्यांना जाणवले नसेल पण मी माझ्या अश्रुमय डोळयांनी ते पाहिले. आम्ही दोघ ही एकमेकांना चुकवुन अश्रुंचा खेळ खेळत होतो खरे पण हि वेळ रडायची नव्हती तर धैर्याने लढायची होती. पण शेवटी भावना... भावनाच... त्या आवरल्या तरच नवल..
मला चिंता वाटत होती माझा लहान मुलगा श्रेयनकुमारची. माझी मोठी मुलगी प्रतिक्षा वयाने लहानच पण खुपच समजदार. तिने समजुन घेतल पण श्रेयनकुमारला माझ्याशिवाय करमत नव्हत. मी त्याला कितीही रागवले तरी त्याला मिच हवा असतो. विशेष करून रात्री झोपताना माझ्या कुशीत येऊन मला घट्ट मिठी मारून त्याला झोपायची सवय व मागच्या पंधरा सोहळा दिवसापासून मी त्याच्या जवळच नव्हतो. त्याला माझी आठवण आली कि तो अचानकच रडत होता. मला प्राॅमिस करून सांगा तुम्ही कधी येणार नाहितर मला तुमच्याकडे घेऊन चला म्हणु लागला. हळुहळु त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि खर तर प्रतीक्षानेच त्याला समजावले. मित्रानो श्रेयनकुमार सोबत डिल करताना मला सुद्धा खुपच वेदना होत होत्या. कुटुंबातील प्रत्त्येक सदस्यांना, मित्र, आप्तेष्टांना बोलताना त्यांना समाधान वाटेल असेच बोलत गेलो पण एक गोष्ट मात्र नक्की सतत आठवत होती आणि ती म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या काही ओळी,
"नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया"
"काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप"
"सोडविना राजा देशीचा रे चौधरी, आणिक सोयरी भली भली"
"तुका म्हणे तुला सोडविणा कुणी, एका चक्रपाणी वाचुनी"
आपण या माये मधे नअडकता, नखचता जीवनमुक्तीचा मार्ग धरला पाहिजे. म्हणजे आपणास कसलाही त्रास होणार नाही. पण हि वेळ भावनेच व रक्ताच नाजुक नात एकीकडे तर दुसरीकडे करोनाच भयानक (भितीदायक) अस्तित्व आ वासून उभ होत. या दोन्ही मध्ये अडकलेलो मी माझी प्रचंड इच्छाशक्ती, खच्चून भरलेला आशावाद व आत्मविश्वासासह उभा होतो. मला माहिती होत सगळेच पॅनिक होऊन गोंधळच उडणार होता म्हणून शांतपणे व संयमाने सर्वकाही करणे गरजेचे होते.
मी परत माझ्या रूम मध्ये येऊन बेडवर पडुन राहिलो. फक्त वडिलांच्या फोनची वाट पहात होतो. वेळ काहि जात नव्हता. थोड्याच वेळात फोन आला आणि वडिलांनी सांगितले आम्हा #सगळ्यांचे_रिपोर्ट्स_निगेटिव्ह_आले आहेत आणि आता तु निवांत रहा. मला एवढा आनंद झाला कि मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी लागलीच वडीलांना हसत म्हणालो मी अगोदरच निवांत होतो आता तर पुर्णपणे निवांत आहे. वडिलांना सांगितले की जरी रिपोर्टस निगेटिव्ह आले असले तरी घरी तुम्ही सर्वजन वेगवेगळ्या मजल्यावर एका आठवड्यासाठी एकटे रहा आणि संपूर्ण घर सॅनिटाइज करुन घ्या. वडिलांनी लागलीच संपूर्ण घर सॅनिटाइज करून घेतल आणि वेगवेगळ्या मजल्यावर रहाण्यास सुरुवात केली.
मला जी मनातुन भिती होती ती आता संपली होती. दुसऱ्या ठिकाणी जाऊन अॅडमिट होण्याचे वगैरे विषय संपुन गेले होते. आदरणीय श्री संजयजी स्वामी (समुपदेशक, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर) यांना पण फोन करून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली व त्यांनी केलेल्या मदती बद्दल व समुपदेशन नाबद्दल त्यांचे आभार मानले. आता टार्गेट फक्त एकच आणि ते म्हणजे कोविड-19 वर यशस्वी मात बस.
पण या ठिकाणी एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आणि ती म्हणजे ज्या दिवशी मला वाटल की माझ्या शरिरामधे काहितरी वेगळ होतय आणि मी एकांतात रहायला हव त्याच दिवशीपासुन मी एकांतात रहायला सुरुवात केली. घरातील कोणत्याही सदस्यांना माझ्या जवळ येऊ दिले नाही आणि होम आयसोलेशनचे पुर्ण नियम तंतोतंत पाळले आणि म्हणूनच या लढाईत कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप राहिले. म्हणुनच मित्रानो शासनाने व आरोग्य विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने घालुन दिलेली नियमावली तंतोतंत पाळण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलाच पाहिजे. यातुन सुद्धा जर का आपणास संक्रमण झालेच तर आपला परिवार तरी सुखरूप राहु शकतो. मित्रांनो आपला परिवारच आपली खरी ताकत आणि खरी कमकुवत बाजु असते. आपण एकटे काहीही सहन करण्याच्या मानसिकतेत असतो पण परिवार म्हणल की डोळ्यासमोर अंधकार येतो. काहिच सुचत नाही. पण आपण सदैव कमकुवत बाजुवर प्रकाश नटाकता सकारात्मक बाजुवर फोकस केला पाहिजे. सदैव एक चेतना एक ऊर्जा घेऊन आयुष्याचा रथ चालविला पाहिजे. मित्रांनो संकटे हे फक्त आणि फक्त जाण्यासाठीच येत असतात, चुकतो ते आपण त्याला घट्ट धरून बसतो आणि दुसर्या असंख्य सकारात्मक वाटा बंद करून टाकतो.
मी दिपक मठपतीजी, नागेश भाऊ, श्रीकांतजी हिरेमठ, जगदीश स्वामी, संजयजी स्वामी (समुपदेशक, जिल्हाधिकारी’ कार्यालय, लातूर), ताजोदिन सय्यद या सर्वाचे आभार मानले आणि खरच या कठीण प्रसंगी जेव्हा कोणीही कोविड-19 च्या भितीमुळे जवळ येत नाही अशा परिस्थितीत या सर्वानी माझ्या परस्पर माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी सर्वकाही केल जे मला अपेक्षित होत किंबहुना गरजेच होत आणि खरच मनाला परत एकदा खात्री झाली की नाती हि ह्रदयाचीच असतात रक्ताची नाही. आपण सदैव मी... मी.... आणि मीच या ढेकीतच वागत आणि जगत असतो. मी आमका... मी तमका... मला कोणाची गरज नाही... मी आंव आहे आणि त्यांव आहे हेच ओरडत असतो.... पण आपण हे विसरतो कि फक्त मी.... आणि मी म्हणजेच जीवन नसत... मी म्हणजेच आयुष्य नसत.... मी म्हणजे अहंकार असतो.... मी पेक्षा आपण म्हणत राहिलो व त्याप्रमाणे आयुष्य जगत गेलो तरच आयुष्याचा खरा आनंद घेता येतो व..... अकेले ही चला था गालिब ये मंजिल मगर... लोग साथ आते गये और कारवां बनता चला गया। हे आपल्या आयुष्यात घडल्या शिवाय रहाणार नाही.
मी ठरवल होत पहिले चार दिवस कोणाशीही संवाद करायचा नाही. खुप मित्राचे, नातेवाईकांचे फोन येऊन गेले. पण नेटवर्क अभावी मी कोणाशीही संवाद साधू शकलो नाही. जास्तीत जास्त मेसेजेस च्या माध्यमातून शुभचिंतकांना बोलत राहिलो. पुर्ण फोकस हा माझ्या दिनचर्येवर केला. जसे सकाळी 5.30 वा उठणे. फ्रेश होणे. 7 पर्यत थोडी वॉकिंग व प्राणायम करणे, वाफ घेणे, 8 वा अगदी हेल्दी नाष्टा करणे व काढा पिणे. सकाळचा मेडिसिनचा कोर्स घेणे. स्नान करून आणलेल्या आवडीच्या पुस्तकाचे 12 वा पर्यत वाचन करणे. 12 च्या आसपास कोविड-19 चे खरे योद्धे (डाॅक्टर्स व पॅरामेडिकस) ज्यांना आपण डाॅक्टर रूपी साक्षात ईश्वर म्हणले तरी चालेल त्याच्या दैनंदिन तपासनी मोहिमेत दाखल होणे आणि दुपारच्या जेवणाच्या आगमना पर्यत आराम करणे. साधारण 1 ते 2 च्या दरम्यान जेवण (अगदी सुंदर) यायचे. जेवण करुन मेडिसन घ्यायची आणि 3.30 पर्यत आराम करायचा. साधारण 4 वा काढा आणि फळ मिळायची ती खालीच प्रांगणात सहकारी मित्रांसोबत गप्पा मारत मारत संपवुन परत आपल्या रूम मधे यायचे. अधुन मधुन सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान झुंबा डान्सचा आनंद घ्यायचा आणि घरची मंडळी आणि शुभचिंतकांना थोडस फोनवरून संवाद साधायचा आणि संध्याकाळी 8 वा जेवण आणि हळदीचा काढा यायचा त्याचा आनंद घेऊन परत एकदा रूटिन चेकअप करून संध्याकाळच्या मेडिसिन घ्यायच्या आणि साधारण 10.30 पर्यत वाचन करत करत झोपी जायचे. अशी एक वेगळीच पण प्रभावी दैनंदिनी सुरू झाली. सर्व घरातील डॉक्टर मंडळींना आदरणीय डॉ. शिवाजी काळगे मामा, डॉ. सविता मामी, डॉ. शिवकुमार जिजू, रूद्रा जिजु, डॉ ज्योती ताई, डॉ. अशोक मामा, डॉ. प्रवीण, डॉ. जयमाला, डॉ. आरती आणि सर्वात महत्वाचे माझी आत्त्या विमल ताई या सर्वाना माझा दिवसातील 4 ते 5 वेळा Spo2 Saturation आणि Temperature ची माहिती वाॅटस अप वर द्यायची आणि त्यांचे पण वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायचे. खर तर मी अगदी कमी वेळात रिकव्हर होऊन घरी येण्यात महत्वाचा वाटा असणारी हि आमच्या #घरातील_बुद्धीवादी_करारी_फौज_होय. याच दरम्यान माझ्या कुटुंबातील चिंतेत असलेल्या काक, काकू, आत्त्या, भाऊ, बहीण या सर्वांना पण एक एक करून बोलत राहिलो. विशेष म्हणजे माझी मोठी आत्त्या नेहमीच माझे मनोबल वाढवायचे काम करते. या वेळी सुद्धा तिने खूपच महत्वाची भूमिका पार पडली. याच बरोबर माझे स्नेही बालमित्र फिजिशियन व करोना फ्रंट लाइन फायटर ज्यांनी करोनावर यशस्वीपणे मात करून परत रुग्णसेवा अविरत सुरु ठेवली ते मा. डाॅ. श्री. गजानन हलकंचे सर सतत माझा फाॅलोअप घेऊन मला धिर दिला आणि योग्य मार्गदर्शन केल. हॅट्स ऑफ टु यु डियर! You are simply the best one! We're proud of you!
माझे कोविड-19 केअर सेंटर मधील सहकारी, आदरणीय श्री मेनकुदळेजी आजोबा, बिराजदारजी, डुकरेजी, घाडगेजी, घोडकेजी, कांबळेजी असे काही स्नेही मित्र पण मिळाली ज्याच्या सहवासात वरिल उपक्रमांच्या माध्यमातून करोनाला मात देण्याची यशस्वी झुंज चालु होती. या ठिकाणची एकंदरीत व्यवस्था व शिष्टाचार पाहुन खरच शासन व प्रशासन दोघांचेही करावे तेवढे कौतुक कमीच आहे. विशेषत आपल्या लातूर जिल्हाचे सन्मानिय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. श्री. #जी_श्रीकांत_सरांचे कौतुक व अशा दर्जेदार सेवासुविधांसाठी खुप खुप आभार. आपल्या लातूर जिल्हाचे खरच नशीब की अशा कोविड-19 च्या परिस्थितीत आपल्याला मा. श्री. जी. श्रीकांत सरांसारखा एक #उमदा, #डॅशिंग, #कर्तव्यदक्ष, #सेनसेटिव, सर्वसामान्यांची जान असणारा व #कार्यतत्पर प्रशासकीय अधिकारी लाभला. या माणसांनी नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अनेक प्रकारे प्रबोधन केल. वेळोवेळी फेसबुक लाइव च्या माध्यमातून सर्वाशी संवाद साधला, स्वतः कोविड-19 सेंटरची, शासकीय रुग्णालयाचे PPE किट घालुन दौरे केले. स्वतः संशयीतांचे स्वॅब घेतले. आपला संपर्क क्रमांक जनतेमध्ये जाहीर सांगुन टाकला आणि काहीही अडचण असेल तर थेट संपर्क करा असे म्हणणारा #IAS_अधिकारी_मी_तरी_माझ्या_आयुष्यात_पाहिलाच_पहिला. सरांना त्याच्या भावी आयुष्यासाठी व यशस्वी प्रशासकीय वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. बाहेर राहुन सतत टिका करण सोप आहे पण प्रत्यक्ष फ्रन्ट लाइनला येउन या परिस्थितीत काम करण खरच खूप हिमतीच आहे. म्हणुन सर्व फ्रन्ट लाइनला राहुन कार्य करणाऱ्या कोविड-19 #यौदधयांना_नमन:.
दररोज वेगवेगळ्या मित्रांना समजत होत त्यांचे फोन, मेसेज येत होती. सर्वजण धीर देत होती व लवकर बरा होशील म्हणत होते. काही मित्र आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतोय तु लवकर बरा होशील म्हणत होती तर काही मित्र आम्ही संपुर्ण परिवार नमाजमधे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत तु लवकरच घरी येशील म्हणत होते. काही कुटुंबातील सदस्य बोलत बोलतच रडत होती आणि गहिवरून जात होती. माझ काम मात्र सगळ्यांनाच आत्मविश्वासाने बोलने आणि धीर देणे की मी लवकरच ठिक होईन काहीही काळजी करू नका.
पण एक गोष्ट मात्र नक्की, या सर्व आप्तेष्टांना बोलताना माझ्या मनात एक खात्री झाली आणि ती म्हणजे की हा कोविड-19 हा आता शारीरिक आजार न रहाता मानसिक आजार बनत चालला आहे. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, विविध वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था, इतर सर्वजण यासंबंधी वेळोवेळी माहिती देत आहेत. सर्व पातळीवर याचा योग्य प्रचार प्रसार करत आहेत. घ्यावयाची दक्षता सांगत आहेत. संक्रमित झाल्यानंतर सुद्धा घाबरण्याचे कारण नाही व योग्य पद्धतीने योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार कमी होतो म्हणून सांगत असताना सुद्धा लोकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. कोविड 19 ने जगाला (विशेष करून माणसांना) दाखवुन दिले कि, प्रथ्वीवरील विचारशील, प्रचंड बौद्धिक क्षमता असणारा, सामाजशिल प्राणी म्हणुन ओळखला जाणारा मनुष्य हा करोनाला मृत्यूच समजु लागला आणि मृत्यु समोर दिसला कि घाबरने स्वाभाविक आहे पण मुळात करोना म्हणजे मृत्यू हे आपल्या मानसिकतेतुन व परराष्ट्रातील परिस्थिती पाहुन निर्माण झालेल्या बेसलेस भयाला, भितिला आपल्या मनातुन काढुन टाकण्याची खरी गरज आहे. आपणच आपल्या सामाजिक माध्यमातून वाचतो, पहातो, ऐकतो कि 90 वर्षाचा व्यक्ती ठणठणीत होऊन घरी गेला, 95 वर्षाचा व्यक्तीने करोनावर मात केली. आणि अशा अनेक गोष्टी समाजात घडतायत. मी सुद्धा माझ्या उपचारा दरम्यान अशा अनेक अविश्वासनिय केसेस अगदी यशस्वीपणे ठिक होऊन घरी परतल्याच्या पाहिल्या. म्हणुन योग्य वेळी याचे निदान व योग्य उपचार घेतल्यास निश्चितच आपण याच्यावर यशस्वीपणे मात करु शकतो. निश्चितच वयोवृद्ध लोकांनी जास्त काळजी घेणे अपेक्षित आहे आणि त्यातल्या त्यात अगोदरच काही आजारांनी ग्रासलेल्यांनी तर खुपच काळजी घेणे अपेक्षित आहे. पण योग्य वेळी निदान, योग्य उपचार, प्रखर इच्छाशक्ती व अखंड आत्मविश्वासाच्या जोरावर आपण करोनाला निश्चितच मात देऊ शकतो हे मात्र नक्की.
कोविड-19 केअर सेंटर मधील एक एक दिवस जात होता. ज्याच्या सोबत माझा अॅडमिशन झाल्यानंतर परिचय झाला होता ते सर्व माझ्या अगोदर तिथे आली होती आणि स्वाभाविकच ते माझ्या अगोदर जाणार. एक एक करून सर्व नवपरिचित मित्र डिस्चार्ज होत होती. या सवगंडयामुळे कसातरी वेळ जात होता पण आता परत राहिलेले तीन चार दिवस एकटच रहावे लागणार म्हणून थोड फिल होत होत. खर तर, "ये भी शायद ज़िंदगी की इक नई अदा बन गयी है दोस्तों, जिसको करोना हो गया वो और भी तन्हा और अकेला हो गया"। हा.... हा.... हा.... हा.... हा.... जवळपास अशीच परिस्थिती माझी झाली होती पण खचेल तो मी कसला.... खरतर एकांत, अडचणी, संकटे आणि दृढनिश्चय, सकारात्मकता, सातत्य व प्रामाणिकता हे सर्व प्रवाह मी अनुभवले होते आणि त्यातुन यशस्वीपणे मार्ग काढत आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आलोय. खर म्हणजे कोणीतरी म्हणलय की,
जिथे सुर्य व चंद्र एकटे राहुन सर्व विश्वास उर्जा, प्रेरणा व शितलता देऊ शकतात तर आपण का नाही. आपल्यावर कोसळलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करण्यासाठीच मी हा लिखानाचा, नवाचलेली काही पुस्तके वाचण्याचा व काही दुर्लक्षित जुन्या मित्रांना फोन करुन बोलण्याचा अट्टहास या दरम्यान केला. ज्याप्रमाणे आपणास एखाद्या नको असलेल्या गोष्टीचा विसर हवा असतो व तो विसर निर्माण करण्यासाठी आपण एक वेगळे विश्व तैय्यार करुन त्यात रममान होण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी प्रत्त्येकांनी या पेंडॅमिक काळात अशाच प्रकारचे वेगळे विश्व तैयार करण्याची गरज आहे. सततच्या कोविड-19 च्या अनुशंगाने येणाऱ्या विविध बातम्या व अपडेट थोड्याशा दुर्लक्षित करुन सकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या बाबीकडे लक्ष केंद्रित करण गरजेच आहे. आपण विविध साहित्याचे वाचन करु शकतो, योग प्राणायम व मेडिटेशन करून सकारात्मकता वाढवु शकतो. तुमच्या आवडीच्या हास्य निर्माण करणाऱ्या मुव्हीज पाहु शकतो. एकदंरीत कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती व आपणास आलेले अनुभव याचे तुमच्या शब्दात चित्रण करु शकतो (जसा मी एक प्रयत्न काही मित्रांच्या आग्रहस्तव करतोय) अशा एक नाही अनेक बाबी आपण या दरम्यान यशस्वीपणे करु शकतोत. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाआ आपण अगदी स्टेबल व सकारात्मक विचारांच्या वर्तुळातच ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे पी. बी. शेली नी त्याच्या एका कवितेत महणलय की, "If winter comes, can spring be far behind.." अगदी त्याचप्रमाणे, हा काळ, निर्माण झालेली अवस्था, परिस्थिती, सामाजिक अस्वस्थता सर्व काही निवळेल. अंधकार जाऊन प्रकाश येईल. शासन, प्रशासन योग्य दिशेने पाऊले उचलत आहे. फक्त गरज आहे ती आपण समाज म्हणुन स्टेबल रहाण्याची व सहकार्य करण्याची.
एक एक दिवस जात होते. अनेक शुभचिंतकांचे व जिवलग मित्रांचे फोन येत होते (प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही). आदरणीय प्राचार्य साहेब (डॉ. दिलीप गरुड सर/ Dr. Dilip Garud) दोन दिवसाला मला फोन करून तब्बेतीची विचारपूस करत होते. काही सहकारी मित्र पण संपर्कात होते. बरेच जन आहेत पण मला ज्यात आदरणीय नागेश भाऊ, श्रीकांतजी हिरेमठ, जगदीशजी स्वामी, अभिजित, अजित भाऊ, रमेशजी बामनकर, प्रविण माने, ताजोदिन सय्यद, अशा काही मित्रांचा खास उल्लेख करावासा वाटतो ज्यांनी मला आवश्यक असणाऱ्या गोष्टी/वस्तु कोविड-19 केअर सेंटर पर्यंत सर्व प्रोटोकॉल पाळुन पोहोचविल्या आणि माझा त्याच्याप्रती असणारा आदर व भावना वृद्धिंगत झाली. दुसरीकडे माझ्या घरी पूर्णपणे लक्ष देऊन मदत करणारे व सतत मला फोन करून विचारपूस करणारे माझे स्नेही मित्र ब्रह्मानंद पोतदार, सिदधु मठपती, राहुल जावळे, महादेव हलसुरे,सौरभ ताथोडे, प्रवीण माने, दत्ता मोरे, डॉ धनंजय मेनकुदळे सर, अॅड. मंठाळेजी, ओम, मयुर कोटे, अभिजित मुद्कण्णा, प्रसाद शिवनगे, अॅड प्रशांत मरळे,प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्रदीपजी चिद्रे अप्पा, अजित भाऊ, विकास भाऊ,सुशिलजी अग्रवाल, राजू सावरीकर सर, मनोज सस्वामी सर, डॉ. सागर कोंडेकर, डॉ. संदीप चव्हाण, प्रशांत भिंगोले, हणमंत रोंगे, अॅड धनंजय मिठ्करी, राजु हेंगने, मनोज कुलकर्णी या सर्वाचे खरच खुप खुप आभार. खरच A friend in need is friend indeed....
आपण पहातोय (मी स्वतः अनुभवलोय) एखाद्याला करोना झाला म्हणल की त्याच्याकडे बघायचा द्रष्टिकोनच बदलला आहे’. जवळ येऊन मदत करायचा तर खुपच लांबचा विषय. मा. जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या एका फेसबुक लाइव मधे खुप छान सांगितल होत कि, तो रोग भयानक आहे का तर आहे पण तो व्यक्ति भयानक नाही हो. पण समाजातील अशी संकुचित विचारसरणी त्या करोना ग्रस्त व्यक्तिला अशा वागण्यातून नाउमेद बनवते आणि याचा परिणाम त्यांची कोविड-19 च्या विरुद्ध लढण्यावरच्या क्षमतेवर होतो. त्यामुळे मित्रांनो वैद्यकीय शास्त्रावर विश्वास ठेवा, आपले डाक्टर्स, पॅरामेडिकस इतर सर्व आपल्याला योग्य उपचार-आधार देण्यासाठी चोवीस तास सेवेत आहेत. म्हणुन या करोना महामारी च्या संकटात मानवता किंवा निर्माण झालेल्या ऋणानुबंधांस, नात्यास डाग लागणार नाही व आपणच आपल्याला आरशात पाहून आपली लाज वाटणार नाही असे वागु नका. मनाने खचलात की संपलात....लढण्याची जिद्द सोडलात कि संपलात...रडायच नाही तर फक्त आणि फक्त लढायच. शेवटी कोविड-19 केअर सेंटर मधील दिवस पहात पहात गेली आणि तो दिवस आला. मला फोन आला आणि त्यांनी सांगितले कि माझा आज माझा डिस्चार्ज होणार आहे व औपचारिकता पुर्ण करण्यासाठी खाली या. मी लागलीच खाली जाऊन सगळ्या औपचारिकता पुर्ण केल्या आणि परत रुममध्ये असलेले सर्व सामान पॅक करण्यास सुरुवात केली. माझा बालपणीचा जिवलग मित्र ताजोदिनला माझी कार कोविड-19 केअर सेंटर च्या पार्किंग मध्ये सोडून जाण्यास संगितले. मी माझे स्नेही श्री आकाश (करोना योद्धा) यांना विनंती करून सर्व मेडिकल, पॅरामेडिकल, सॅनिटाइजेशन व पोलीस च्या स्टाफ बंधु भगिनींच्या नावाची त्यांच्या पत्त्यासह माहिती मला देण्याची विनंती केली कारण मला या सर्व करोना वारियर्सना काहितरी नंतर गिफ्ट (As a token of love and respect) पाठवायच होत. ज्याप्रमाणे हि सर्व मंडळी दिवस रात्र अशा पॅनडेंमिक च्या वातावरणात सेवा बजावत होते ते बघून कोणालाही धक्काच बसणार होता. ज्या परिस्थितीत आपल्या घरचेच लोक आपल्या जवळ यायला तैयार नसतात, खासगी रुग्णालय अॅडमिट करून घ्यायला तयार नाहीत, पुरोगामी महाराष्ट्रात आज सुद्धा पारंपरिक द्रष्टिकोनाचा पगडा तेवढाच मोठा ठरत चालला आहे. अशा परिस्थितीत सर्व रूग्णांची निस्वार्थी सेवा करणे. त्यांना आधार देणे. त्याच्यावर उपचार करणे. याला आपण काय म्हणणार. मी तर या सगळ्यांना अक्षरशः ईश्वराचे दुसरे रूपच म्हणेन. कोणी मानो अथवा न मानो. कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो. पण आपला कोठेतरी विश्वास आणि श्रद्धा मात्र निश्चितच असायला हवी. त्यातुन एक वेगळीच उर्मी व ताकत आपण मिळत असते. म्हणतात ना...."नदी वाहे काळ चाले चालावी गुरू...भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु....गुरु लाभला साथी तर भव: सागर हा तरु....गुरू उभा पाठिशी तर भव: भय चिंता हरु.....गुरू माऊली...गुरु माऊली...गुरु माऊली"
अगदी याच प्रकारे पुज्य माय आप्पाची पुण्याई, आई वडीलांचे, कुटुंबातील थोरा मोठ्यांचे आशिर्वाद, मित्र आप्तेष्ट, सहकारी मित्रांच्या, सर्वाच्या शुभेच्छा व प्रेम, सर्व सन्माननीय डॉक्टर मंडळी (घरातील व बाहेरील), पॅरामेडिकल, सॅनिटाइजेशन स्टाफ, केटरींग स्टाफ यांचे सहकार्य व या सर्वाच्या माध्यमातून माझ्यामध्ये निर्माण झालेली लढण्याची व्रत्ती, प्रचंड इच्छाशक्ती व अखंड आत्मविश्वासाच्या जोरावर मी हा कोविड-19 च्या विरोधातील लढा यशस्वी केला. खरच व. पु. नी म्हणल्याप्रमाणे काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान हे फुलाच्या हारातील दोऱ्याप्रमाणे असते ज्यात दिसन महत्वाच नसुन असन महत्वाच असत. अशा सर्व दोऱ्याप्रमाणे माझ्या मैत्रीच्या नात्यात गुंतलेल्या सर्व मित्रांचे खुप खुप आभार...!
मित्रानो कदाचित उद्या माझ्या ठिकाणी (ईश्वर न करो) पण आपण असु शकता. पण हिम्मत न हारता. अगदी शांतपणे, संयमाने व जाज्वल इच्छाशक्ती च्या जोरावर योग्य वेळी योग्य उपचाराच्या सहाय्याने आपण या करोना नामक आजारावर विजय निश्चितच मिळवु शकतो.
मित्रांनो, शेवटी एवढेच म्हणतो की, आयुष्यातील येणाऱ्या प्रत्त्येक कठीण प्रसंगास समर्थपणे तोंड देण्यातच आयुष्याचा खरा आनंद दडलेला असतो... गरज असते ती फक्त प्रचंड इच्छाशक्ती, अखंड आशावाद आणि थोरामोठ्यांची वडिलधारी मनडळींचे आशिर्वाद.... प्रत्येक लढाई जिंकूनच पूर्ण करायची असते.
(काळजी घ्या...सकारात्मक रहा...शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय सूचनांचे पालन करा...पण कोविड-19/करोनाला घाबरू नका)
Comments
Post a Comment